G-20 summit । मागील काही दिवसांपासून देशात इंडिया (India) ऐवजी भारत (Bharat) हे नाव करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. देशाचे नाव भारत की इंडिया असावे यावरून अनेक जण आपले मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे वादाला नवीन तोंड फुटले आहे. भारत की इंडिया? (Bharat or India) या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जर केंद्रानं इंडिया असा उल्लेख वगळून जर भारत असं नाव करून त्याची अधिकृत घोषणा करायचं ठरवलंच तर त्याची प्रक्रिया खूप मोठी असेल. (Latest Marathi News)
सध्या दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. परंतु या परिषदेचे लक्ष वेधून घेतले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर लावलेल्या एका फलकावरून. नरेंद्र मोदी यांच्या समोर असणाऱ्या देशाच्या नावाच्या फलकावर इंडियाऐवजी भारत असे लिहिण्यात आले होते. त्यावरून देशाचे नाव बदलू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर राजकीय वातावरण ढवळू शकते.
परंतु इंडियाऐवजी भारत हे नाव बदलल्याने विरोधक केंद्र सरकारवर नाराज आहेत. याच मुद्द्यावरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. परंतु ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याचवेळा संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्यावर जोर देण्यात आला होता. सध्या ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ही दोन्ही नावं ट्रेण्डमध्ये आहेत. नेटकरीही त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.