राज्यात अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे येत्या 21 जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून हा दौरा 24 जूनपर्यंत असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीकास्त्र डागले आहे. ‘मणिपूर (Manipur) पेटला आहे. पण विश्वगुरु हे आता अमेरिकेत (America) विकत घेतलेल्या लोकांसमोर त्यांचे ज्ञान पाजळणार आहेत. त्यांनी अमेरिकेत जाण्याऐवजी मणीपूरमध्ये जाऊन तेथील लोकांना शांत करून दाखवावं,’ असे थेट आव्हान ठाकरे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
वरळी येथील ठाकरे गटाच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कितीही शाह आणि अफजलखान आले तरी आता मला त्याची पर्वा नाही. कारण तुमच्यासारखे लढवय्ये साथी माझ्यासोबत आहेत. तुमचे ऋण मी कसे फेडू, माझ्याकडे तर पक्षही नाही आणि पक्षाचे चिन्ह नाही. लाचार मिंध्ये त्या पलीकडे गेले. त्यांच्या गद्दारीला आता एक वर्ष होईल, अशी जहरी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
‘अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांच्यावर शाईफेक झाली, शिंदे या महिलेला मारहाण झाली. आता महिला गुंड तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिलेवर अत्याचार केला म्हणून मी एकाला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. परंतु ते सत्तेसाठी सत्तारांना सोबत ठेवत आहेत. आम्ही नामर्दाची औलाद नाही, सत्तेची मस्ती आहे. हा फुगलेला फुगा आहे, तो फोडायला जास्त वेळ लागणार नाही.
जर तुम्हाला इतकीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये दाखवा. तुमचे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवून ते परत येतात का पहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मणिपूरमध्ये जाऊन आले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मणिपूर राज्य पेटलेले असताना तुम्ही अमेरिकेत निघाला आहात. जर हिंमत असेल तर मणिपूरमध्ये जा.’