राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यापासून महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक दिग्ग्ज नेते महाविकास आघाडीची पाठ सोडून शिंदे फडणवीस सरकारची साथ देत आहेत. अशातच आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या (BJP) वाटेवर आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
‘शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा त्यांना माहिती होत पुढे काय होणार. जर त्यांनी राजीनामा दिला तर मी मेलोच, या भीतीपोटी ते रडत होते. कारण त्यांचे रडणं वेगळं होतं. हे असे बोलणारे पटकन उड्या मारत असतात. त्यावेळी त्यांनी फक्त रडण्याचं नाटक केले होते. काही दिवसात वाट पहा, त्यांनी कुठे तरी मार्गक्रमण केले असेल. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला आमचा एवढा का पुळका आला आहे, हे मला समजत नसल्याचे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच आता संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्या दाव्यावर जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.