
Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार) यांना पक्ष चिन्ह म्हणून ‘तुतारी’ हे नवीन चिन्ह बहाल केले आहे. शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आमचे उमेदवार याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार गटाने सांगितले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘तुतारी’ हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह आहे.
शरद पवार गटाने ट्विटरवर माहिती शेअर करत म्हंटले आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”