
Ranjit Kasle Dismissed l गेल्या काही दिवसांपासून वादात असलेले निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्यावर आता पोलीस खात्याने थेट सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. बीड पोलिसांनी पुण्यातून त्यांना अटक केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311(2)(ब) अंतर्गत पोलीस सेवेतून पूर्णपणे बडतर्फ करण्यात आलं आहे.
Jayakwadi dam water Level । जायकवाडी धरणात पाण्याचा साठा कमी; बाष्पीभवनामुळे टंचाईचा धोका
कासले यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. या प्रकरणात जातीविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप असून, गुन्हा क्रमांक 213/25 अंतर्गत त्यांना 18 एप्रिल 2025 रोजी अटक करण्यात आली. त्याआधी कासले यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपण शरण येण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. पण पोलीस आधीच हालचाली करत होते. अखेर पुण्यातील स्वारगेटमधील एका हॉटेलमधून त्यांना पहाटे अटक करण्यात आली.
ही कारवाई केवळ कायदेशीर बाबींपुरती मर्यादित नाही, तर त्यामागे राजकीय आरोपांचीही मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचं एन्काऊंटर करण्यासाठी दबाव आल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर, मतदानाच्या दिवशी त्यांच्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचा खुलासा करत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. हे पैसे त्यांना निवडणुकीपासून लांब राहण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
या सगळ्या घडामोडींमुळे राज्याच्या पोलीस प्रशासनात खळबळ माजली असून, कासले यांच्यावर आता राजकीय दबाव, आर्थिक व्यवहार आणि जातीविरोधी वक्तव्य या तिन्ही आघाड्यांवर चौकशी होणार आहे. पोलीस खात्याने घेतलेली ही निर्णायक कारवाई राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे.