मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk Price) वाढले होते. त्यामुळे पशुपालक दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होते. आता याच पशुपालकांच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे. कारण वाढलेल्या दुधाच्या दरात पुन्हा मिठाचा खडा पडला आहे. काही दिवसांपूर्वी गायीच्या दुधाला (Cow Milk) फॅटनुसार 37 रुपयांपर्यंत प्रतिलिटर असा दर होता. आता यात दरात चार रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे दर 33 रुपये प्रतिलिटरपर्यंत झाला आहे. (Latest Marathi News)
यापूर्वीही दरात घसरण झाली होती. आता पुन्हा दर घसरल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. गायीच्या दुधात दरवाढ झाली असली तरी म्हशीच्या दूधदरात कोणतीही घसरण झाली नसल्याने पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच जनावरांच्या पशुखाद्यात कमालीची दरवाढ झाली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर तसेच वाघोली, तिसंगी, गर्जेवाडी, कुची या ठिकाणी हा दुय्यम व्यवसाय केला जातो. घाटमाथ्यावर जनावरांची संख्या एकूण सात हजारांपर्यंत आहे. यात जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त असून आता या पशुपालकांकडे उपलब्ध असणारा चारा संपला आहे, अशातच पावसानेही दडी मारली असून पशुखाद्यात दरवाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे.