Ajit Pawar । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी आमदारपदही सोडले आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी मिलिंद देवरा यांनी १४ जानेवारीला तर बाबा सिद्दीकी यांनी ८ फेब्रुवारीला काँग्रेस सोडली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्यांनी राजीनामा दिल्यांनतर यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली दरम्यान आता यावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “एवढी वर्ष एकाच पक्षात राहिलेली व्यक्ती सहजासहज पक्ष सोडत नाही, काहीतरी गडबड असेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. “अशोक चव्हाण यांच्याबद्दल आम्ही गेली अनेक दिवस ऐकत होतो. या चर्चेला आज मुहूर्तरुप मिळाले.”, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार
अशोक चव्हाण यांनी काल राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असे म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.