Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला जोर आला असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दोन अनुभवी आणि प्रभावशाली नेत्यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेडीवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षला तेलमुले यांनी आज काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या प्रवेशामुळे गडचिरोलीतील काँग्रेसची ताकद वाढली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाला आधीच अनेक नेत्यांच्या निर्गमाचा फटका बसला होता. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा दोन ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्याने पक्षात अस्वस्थता वाढली आहे.

काँग्रेसने मात्र या प्रवेशामुळे आत्मविश्वास दाखवला आहे. “गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा बळकट होणार आहे. अनुभवी नेते पक्षात आल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होईल,” असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राज्यात पुढील काही दिवसांत नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. अशा वेळी शरद पवार गटातील नेते काँग्रेसकडे वळू लागल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. या घडामोडीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे आणि महाविकास आघाडीतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Spread the love