Hiradgaon News । हिरडगावात नव्या आठवडा बाजाराचे भव्य उद्घाटन — प्रतिभाताई पाचपुते यांच्या शुभहस्ते गावाच्या वैभवात भर

Hiradgaon News

Hiradgaon News । हिरडगाव | गावाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत एक नवा टप्पा गाठत हिरडगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. या बाजाराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्री मा. प्रतिभाताई पाचपुते यांच्या शुभहस्ते हिरडगाव फाटा येथे करण्यात आले.

ग्रामपंचायत सरपंच विद्याताई बनकर व उपसरपंच अमोल दरेकर यांच्या प्रयत्नांतून या बाजाराची कल्पना साकार झाली. परिसरातील ग्राहक, कारखान्यातील कामगार तसेच ऊसतोडणी कामगार यांना आवश्यक वस्तूंची सोय व्हावी, स्थानिकांना रोजगार व व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास मा. रोहीदास यादव (जनरल मॅनेजर, गौरी शुगर), पंचायत समिती सदस्य सौ. अनुराधा ठवाळ, चेअरमन भरत भुजबळ, व्हाइस चेअरमन सौ. शोभाताई दरेकर, माऊली महाराज म्हस्के, हनुमंत महाराज पावणे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीफळ फोडून बाजाराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

आपल्या भाषणात मा. प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या, “या ओसाड माळरानावर दादांनी कारखाना उभा केला आणि हिरडगावाला नवं वैभव मिळालं. आता या आठवडा बाजारामुळे गावाच्या विकासात आणखी एक सोनेरी पान जोडले गेले आहे.”

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काष्टी सोसायटीचे माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर यांनी भूषविले. प्रास्ताविक भाजप युवा नेते मिलिंद दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर यांनी मानले. सूत्रसंचालन परशुराम भुजबळ आणि भाऊसाहेब काळे यांनी केले.

उद्घाटन सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ, सोसायटी संचालक, गावपंचायत सदस्य आणि विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बाजार सुरू झाल्याने हिरडगाव व परिसरातील व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Spread the love