
Kolhapur News । कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला सुधारगृहात राहणाऱ्या सहा नृत्यांगनांनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या सहाही महिलांनी आपल्या हाताच्या नसा कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुधारगृह प्रशासनाने वेळीच ही बाब ओळखत तातडीने कारवाई केली आणि सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे सहा महिलांचे जीव वाचले असून सध्या त्या उपचाराखाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरातील एका डान्स बारवर छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान या सहा नृत्यांगनांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना कोल्हापूर येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, सुधारगृहातील वातावरण, मानसिक तणाव आणि घरापासून दूर राहण्यामुळे त्या महिलांवर मानसिक दडपण वाढत गेलं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आज सकाळी अचानक सहाही महिलांनी एकत्रितपणे आपल्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. काही क्षणांतच ही बाब इतर कैद्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. सुधारगृह प्रशासनाने तत्काळ त्या सहाही महिलांना रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत त्यांच्या जीवावर आलेलं संकट दूर केलं.
या घटनेमुळे कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे या महिलांनी असा टोकाचा निर्णय घेतला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मानसिक त्रास, नैराश्य किंवा अन्य काही कारण यामागे असू शकतं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या सर्व नृत्यांगना रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून सुधारगृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.