Cyclone Biporjoy । राजस्थानच्या (Rajasthan) अनेक भागांना बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसत आहे. गुजरातनंतर (Gujarat) हे वादळ आता राजस्थान आणि पाकिस्तानच्या (Pakistan) दिशेला सरकत आहे. त्यामुळे मागील 24 तासांपासून राजस्थानमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून एकूण 500 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. या वादळाने जालोरमध्ये थैमान घातले आहे. तर सांचोरमध्ये 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस, चितळवण आणि राणीवाडा येथे 200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान यापूर्वीच हवामान खात्याने राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. तसेच आता हवामान खात्याने बाडमेर, जालोर आणि सिरोहीमध्ये रेड अलर्ट तर पाली आणि जोधपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच जैसलमेर, बिकानेर, चुरू, अजमेर, उदयपूर, राजसमंद, सीकर, दौसा, अलवर, भिलवाडा, नागौर, झुंझुनू, जयपूर, जयपूर सिटी,चित्तौडगड, करौली, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरु आहे. येत्या 12 तासांत हवामान खात्याकडून आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजेचे खांब पडले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.