
Havaman Andaj । राज्यात माॅन्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह अनेक भागांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Hagawane Fortuner Car | वैष्णवी हगवणे प्रकरण; अजित पवारांच्या हस्ते चावी दिलेली ‘ती’ फॉर्च्युनर जप्त
माॅन्सून सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर या भागात स्थिर असून कर्नाटकात कलबुर्गी, तेलंगणात मेहबुबनगर आणि आंध्र प्रदेशात कावलीपर्यंत पोहोचलेला आहे. ईशान्य भारतातही माॅन्सूनची सीमा कालच्याच भागात स्थिर आहे. हवामान विभागानुसार माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागांमध्ये माॅन्सून प्रगती करेल.
आज रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून दोन दिवसांनंतर या भागांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सर्व नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.