Badlapur School । बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदेच्या घरावर स्थानिकांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर स्थानिक संतप्त होऊन आरोपीच्या घरात घुसले आणि तोडफोड केली. या प्रकारानंतर अक्षय शिंदेच्या वैयक्तिक जीवनाबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अक्षय शिंदेने तीन लग्न केली होती, पण त्या तिघीही महिलांनी त्याच्यासोबत राहणे सोडून दिले आहे. याप्रकरणी अक्षय शिंदेने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला असून, त्याचा जबाब व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा जबाब महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाणार आहे.
ही घटना 13 ऑगस्ट रोजी झाली, जेव्हा बदलापूरच्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. आरोपी अक्षय शिंदे याच शाळेचा सफाई कर्मचारी होता आणि त्याने दोन मुलींना लघुशंकेसाठी घेऊन जाऊन त्यांच्यावर घृणास्पद अत्याचार केले. या घटनेनंतर एका मुलीनं पालकांना घटनेची माहिती दिली. पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला, पण प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शाळेचे सीसीटीव्ही देखील बंद असल्याचे समजले.
17 ऑगस्टला पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण बदलापूर पूर्व पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तक्रार घेण्यासाठी साडेबारा तासांचा विलंब केला. मध्यरात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला अटक करण्यात आली. या विलंबामुळे शुभदा शितोळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.