
ZP-Panchayat Samiti elections । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. प्रचार, सभा, बॅनर, पोस्टर, वाहन वापर यासाठी किती खर्च करता येणार, याबाबत आयोगाने स्पष्ट नियम ठरवले आहेत.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या उमेदवारांसाठी वेगवेगळी खर्चमर्यादा निश्चित केली आहे. जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागांची संख्या लक्षात घेऊन ही मर्यादा ठरवण्यात आली आहे. मोठ्या जिल्हा परिषदांसाठी खर्चमर्यादा जास्त, तर तुलनेने लहान जिल्ह्यांसाठी कमी ठेवण्यात आली आहे.
ज्या जिल्हा परिषदांमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत, त्या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. अशा जिल्ह्यांतील पंचायत समिती उमेदवारांसाठी ही मर्यादा 6 लाख रुपये असेल.
61 ते 70 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये झेडपी उमेदवारासाठी 7 लाख 50 हजार रुपये, तर पंचायत समिती उमेदवारासाठी 5 लाख 25 हजार रुपयांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये झेडपी उमेदवार 6 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकणार असून पंचायत समिती उमेदवारांसाठी 4 लाख 50 हजार रुपयांची मर्यादा असेल.
थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चमर्यादा 6 लाख ते 9 लाख रुपये इतकी आहे, तर पंचायत समिती उमेदवारांसाठी ही मर्यादा 4.5 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खर्चमर्यादेचे नियम लक्षात ठेवूनच प्रचाराची आखणी करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
