
Weather Alert | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईत अंधेरी, सांताक्रूझ, विक्रोळी, घाटकोपर, वरळी, सायन आणि दादर परिसरात 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून अनेक भागांत पाणी साचले आहे. विक्रोळीतील वर्षा नगर येथे भूस्खलनाची घटना घडली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण कोकण पट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा व पुणे घाटमाथा, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १५ ते २० ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक वाढेल.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.