
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाला काल (सोमवारी) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचे एकूण ८ फोन आले होते. हे फोन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या क्रमांकावरून आले होते. या प्रकरणानंतर डीबी मार्ग पोलीसठाण्यामध्ये रुग्णालयांमधील लोकांनी तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केला होता. आता या प्रकरणामध्ये दक्षिण मुंबईतील ज्वेलरला पोलिसांनी अटक केली आहे.
विष्णू भौमिक असं धमकी देण्याऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने जवळपास आठ वेळा रुग्णालयात फोन करुन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. फोन करताना त्याने आपलं नाव ‘अफजल’ असल्याचं सांगितलं होते. पोलिसांनी विष्णू भौमिक या आरोपी विरोधात कलम ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणांनीही या प्रकरणाची माहिती मागवली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मुकेश आंबानीच्या ‘अँटीलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळून आली होती. या स्फोटकांसोबत धमकीची चिट्ठी देखील मिळाली होती. या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने सचिन वझे यांना अटक केली.