Supriya Sule । आंदोलकांच्या विरोधानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मराठा तरुणांच्या…”

Supriya Sule

Supriya Sule । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आंदोलनस्थळी भेट दिली होती. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना काही आंदोलकांनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. घोषणाबाजी, पाण्याच्या बाटल्या फेकणे आणि गाडी अडवून रोष व्यक्त करण्याचे प्रकार घडले.

या प्रकारानंतर आज पुण्यात पहिली प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतके मोठे आंदोलन सुरू असताना अशा काही घटना घडणे साहजिक आहे. मराठा तरुणांच्या मनात काही भावना असतात, त्या समजून घेणे गरजेचे आहे. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी स्वतः आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.”

सुळे यांनी आंदोलनस्थळी असलेल्या अडचणींवरही लक्ष वेधले. “तेथे स्वच्छतेची मोठी समस्या आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही भागांत वीजसुद्धा नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारवर थेट टीका करत सुळे म्हणाल्या, “२०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा जो मार्ग सांगितला, त्याची अंमलबजावणी करावी. गेल्या अकरा वर्षांपासून भाजप सत्तेत असूनही प्रश्न सुटलेला नाही. आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.”

त्यांनी सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. “सर्वपक्षीय बैठक बोलवा, विशेष अधिवेशन घेऊन २४ तासांत निर्णय घ्या. जर गृहखात्याकडे आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची माहिती असेल, तर ती जनतेसमोर सादर करा. अन्यथा हे सरकार अपयशी ठरेल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Spread the love