
Rain Update । राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेती, घरं आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, महत्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात २१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा असून, राज्यातील १५ ते १६ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणात स्थिती गंभीर असून, अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
नाशिक विभागातील तापी आणि हतनूर नद्यांमध्येही पाणी पातळी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसानीची नोंद झाली आहे. घरांचे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात २०६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, लेंडी धरणात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. या भागात रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ हे गाव विशेषतः प्रभावित झाले आहेत.
रावनगाव येथे २२५ नागरिक अडकले असून, त्यातील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भासवाडी येथे २०, भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत. हासनाळमधील ८ नागरिकांना बचाव करण्यात यश आले आहे.
बचावासाठी एनडीआरएफ, लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरहून सैन्याची तुकडी रवाना झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून, तिन्ही जिल्ह्यांमध्ये समन्वयातून बचावकार्य सुरु आहे.