Site icon e लोकहित | Marathi News

Rain Update | राज्यात पावसाचा पुन्हा कहर! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update

Rain Update | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रापर्यंत पसरल्याने राज्यभर ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.

गेल्या २४ तासांत मराठवाडा, रायगड आणि पनवेल परिसरात अधूनमधून जोरदार पाऊस झाला. मात्र हा पाऊस सलग न पडता थोडा थांबून पुन्हा जोर धरतो आहे, त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार १४ सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस, म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), परभणी, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशीम अशा ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या पावसामुळे जनजीवन आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. वर्धा जिल्ह्यात यशोदा नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, तर चंद्रपूरमध्ये दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. परभणीत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुग पिकाचे मोठे नुकसान झाले असून अळ्या व किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाऊस असेच सुरू राहिल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love
Exit mobile version