
Pune Rave Party Case । पुण्यातील खराडी परिसरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सुरुवातीला पोलिसांनी कोर्टात दावा केला होता की, पार्टीमधून तीन महिला पळून गेल्या असून, त्यांचा तपास आवश्यक असल्याने खेवलकर यांची कोठडी वाढवावी. मात्र आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे – या तीन महिलांचा त्या पार्टीशी थेट काहीही संबंध नव्हता.
ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सुरुवातीला ज्या आधारावर कोठडी वाढवण्यात आली, त्याच पुराव्यांची विश्वासार्हता आता तपास यंत्रणांपुढे आव्हान बनली आहे. यामुळे खडसे कुटुंबाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याप्रकरणात एकनाथ खडसे यांनी थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही संपूर्ण घटना केवळ कायदेशीर न राहता, राजकीय रंग घेऊ लागली आहे.
दरम्यान, आज प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी संपत असून, त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलिस गुन्हे शाखा त्यांच्यासह इतर चार आरोपींनाही न्यायालयात सादर करणार आहे. यावेळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करतो की कोठडी वाढवतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात पुढे काय वळण लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.