Site icon e लोकहित | Marathi News

Pune Crime । पुण्यात दहशतवादी? मध्यरात्री मोठी कारवाई; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Pune Crime News

Pune Crime । पुणे शहरातील कोंढवा भागात बुधवारी मध्यरात्री दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवलं. रात्री १२ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही मोहीम चालली. यावेळी एकूण २५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत १८ संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून, त्यातील काही जण सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत.

सध्या या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारवाईपूर्वी संपूर्ण मोहिमेबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांशी संबंधित महत्त्वाची माहिती आधीच मिळाल्यामुळे ही कारवाई राबवण्यात आली. या मोहिमेत मोबाईल सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत.

कोंढवा परिसर मागील काही वर्षांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. यापूर्वीही येथे काही दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आली होती. 2023 मध्ये याच भागातून ISIS शी संबंधित तीन जणांना अटक झाली होती. त्यांच्या ताब्यातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि ड्रोन वापरण्याचे उपकरण जप्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2024 मध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करून हजारो सिमकार्ड्स जप्त करण्यात आले होते. हे नेटवर्क दहशतवादी संपर्कासाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

कोंढवा परिसरात घनदाट वस्ती, मजूर वसाहती आणि काही बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संशयित व्यक्तींना या परिसरात लपणे सोपे जाते, असंही सांगण्यात येत आहे.

या कारवाईमध्ये महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे सहभागी होत्या. सुमारे ४५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत तैनात करण्यात आले होते.

सध्या संशयितांची चौकशी सुरू असून, या मोहिमेचा अधिकृत तपशील लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा पुणे शहरात खळबळ माजली आहे.

Spread the love
Exit mobile version