
Pune Crime । पिंपरी-चिंचवड शहरात सध्या एक नवीन दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून, ‘मास्क मॅन’च्या धाडसी आणि धक्कादायक वर्तनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. भरदिवसा, शहरातील प्रमुख भागांमध्ये चेहऱ्यावर मास्क घालून आणि हातात धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या या व्यक्तीची दृश्यं समोर येत असून, त्याने शहरात खळबळ उडवून दिली आहे.
ही घटना निगडी परिसरातील बजाज ऑटो समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली. मास्क घातलेला हा इसम कोणत्याही भीतीशिवाय रस्ता क्रॉस करत होता आणि त्याच्या हातात मोठा धारदार चाकू स्पष्ट दिसत होता. त्याचा उद्देश नेमका काय होता — हल्ला करणे की फक्त दहशत निर्माण करणे — हे अजून स्पष्ट झालेले नाही.
या मास्क मॅनने चेहरा पूर्णपणे झाकून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याच्या हातातील चाकू आणि त्याचा आत्मविश्वास नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. दिवसा उजेडी, गर्दीच्या ठिकाणी असे हिंसक हत्यार घेऊन फिरणे हे गंभीर चिंता निर्माण करणारे आहे. रस्त्याने जाणारे नागरिक थांबून त्याला पाहात होते, पण भीतीमुळे कोणीही प्रतिकार करण्यास धजावत नव्हते.
याआधीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा घटना घडल्या आहेत. मे महिन्यात ‘कोयता गँग’च्या धुमाकुळाने शहर हादरले होते. आता पुन्हा एकदा अशाच स्वरूपाची धास्ती ‘मास्क मॅन’मुळे निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.