Site icon e लोकहित | Marathi News

Pune Crime News । “जो आमच्या नादी लागेल त्याचं असंच होईल!” — आंदेकर टोळीच्या गोळीबारात १९ वर्षीय आयुषचा थरारक मृत्यू

Pune Crime News

Pune Crime News । पुण्यातील नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबरच्या रात्री घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या १९ वर्षांचा आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीने भर सोसायटीच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून खून केला. ही हत्या एका वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर खुनाचा बदला म्हणून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

आयुषचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध नसतानाही केवळ सूड उगवण्यासाठी त्याला टार्गेट करण्यात आलं. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्याचा धाकटा भाऊ अर्णव कोमकरच्या डोळ्यासमोर घडली. अर्णवला क्लासवरून घ्यायला गेलेल्या आयुषवर पार्किंगमध्येच अमन आणि यश पाटील या दोघांनी धावत येत गोळ्यांचा मारा केला. त्यांच्यासोबत आणखी दोन जण होते. जवळपास १२ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी ९ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्या.

घटनास्थळी जवळपास ३० मिनिटांनी पोलीस पोहोचले, तर रुग्णवाहिका ४५ ते ५० मिनिटांनी आली. तोवर सोसायटीतील एका डॉक्टरने आयुषला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. घटनेनंतर आरोपी पळताना ओरडले, “इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर चालणार, बाकी कोणी नाही. जो आमच्या नादी लागेल त्याचं असंच होणार!” या शब्दांनी परिसर हादरून गेला.

Spread the love
Exit mobile version