Pune Crime Firing | पुणे पुन्हा हादरले! भररस्त्यावर गोळीबार; गाडीला साईड न दिल्याने घायवळ टोळीचा जीवघेणा हल्ला

Pune Crime News

Pune Crime Firing | पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद वाढतच चालला असून, नुकतीच कोथरुड परिसरात भररस्त्यावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. घायवळ टोळीतील गुंडांनी किरकोळ कारणावरून, फक्त गाडीला साईड न दिल्यामुळे, ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रकाश धुमाळ हे त्यांच्या मित्रांसोबत उभे असताना, दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरून घायवळ टोळीतील मयूर कुंभारे याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या धुमाळ यांच्या मानेला व मांडीला लागल्या. रक्तस्त्राव इतका झाला की घटनास्थळी रक्ताचे ठसे स्पष्टपणे दिसून आले. जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी धुमाळ यांनी जवळच्याच एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून लपण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक सचिन गोपाळघरे यांनी त्यांना तात्काळ पाणी देऊन मदत केली.

ही धक्कादायक घटना कोथरुड पोलिस ठाण्यापासून केवळ २०० मीटर अंतरावर घडली. मात्र तरीही पोलीस घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतक्या जवळ असलेल्या ठिकाणी पोलिस वेळेवर पोहोचू शकले नाहीत, हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे.

या प्रकरणात प्रमुख आरोपी मयूर कुंभारे आणि आनंद चांडलेकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुसा शेख, रोहित आखाड आणि गणेश राऊत हे इतर आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

विशेष म्हणजे, प्रकाश धुमाळ यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून, ते संपूर्णपणे निष्पाप नागरिक आहेत. त्यामुळे अशा निष्पाप व्यक्तीवर टोळक्यांकडून जीवघेणा हल्ला होणं, ही पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे.

Spread the love