
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा मुंबईतील मेट्रो ३ कारशेडबाबतचा निर्णय रद्द केला. आणि ही कारशेड आरे कॉलनीच्या परिसरातच करण्याचा निर्णय घेतलाय. महाविकासआघाडी आणि आरेमधील स्थानिक रहिवाशांनीही देखील याला तीव्र विरोध केला. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रविवारी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“राज्य सरकारने गोरेगावमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी (७ ऑगस्ट) आंदोलन करण्यात येत आहे. आरेचं जंगल मुंबईच्या ऑक्सिजनचा मोठा स्रोत आहे.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पर्यावरण प्रेमींकडून विरोध –
झाडाची फांदी कापण्याच्या नावाखाली पूर्ण झाड कापले जात होते असा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता. नंतर कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नये असा आदेश दिला. आरे या ठिकाणचे प्रस्तावित कारशेडच्या जागेतील एकही झाड तोडण्यात आले नसून आम्ही फक्त झुडपे तोडल्याची माहिती यावेळी एमएमआरसीकडून न्यायालयात देण्यात आली. आता पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.