
Pooja Gaikwad | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या रहस्यमय मृत्यूने राज्यभर खळबळ उडवली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ त्यांच्या गाडीत सापडलेल्या मृतदेहामुळे सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे मानले जात होते. मात्र, त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली आढळल्याने आणि कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिस तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे.
दरम्यान, या प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे – ते म्हणजे गोविंद बर्गे आणि बार्शीतील नर्तकी पूजा गायकवाड यांच्यातील प्रेमसंबंध. दोघांमधील नातं दीड वर्षांपासून सुरू असल्याचं समोर आलं आहे. या कालावधीत गोविंद यांनी पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि तब्बल पावणेसात लाखांचा प्लॉट भेट दिला होता. मात्र, काही काळापासून पूजा गोविंदशी बोलत नव्हती, ज्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खालावली होती, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर पूजाच्या इंस्टाग्रामवरील एका रिलमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. मृत्यूच्या आठवडाभर आधी तिने पोस्ट केलेल्या या रिलमध्ये तिच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि पाचशेची नोट दिसते. या रिलमधील ऑडिओमध्ये ती लिप्सिंग करताना म्हणते – “मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल.” ही रिल आणि गोविंद यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.