
मुंबई : सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राजकीय वर्तुळात एकमेकांविरोधात जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda ) यांनी अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व देशातून संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजपा टिकेल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून आता शिवसेनेकडून भाजपा आणि जे. पी. नड्डा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
“भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत,” अशी जोरदार टीका शिवसेनेने त्यांच्यावर केली आहे.
याचसोबत नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात,” असा हल्लाबोल देखील शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
ज्यावेळी संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले होते त्यावेळी राजधर्म वगैरे बाजूला ठेवा आणि हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?” असा सवाल देखील शिवसेनेने यावेळी उपस्थित केलेला आहे.