
MNS । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि एक महत्त्वाचा चेहरा असलेले प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून त्यांचं पक्षातील कामकाजावरून नाराज असल्याचं बोललं जात होतं, आणि अखेर गुरुवारी त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत राजीनामा सादर केला.
प्रकाश महाजन यांनी राजीनामा देताना आपल्या भावना मोकळ्या शब्दांत व्यक्त केल्या. “गंगेला बोल लावला तेव्हा खरंतर थांबायला हवं होतं, पहेलगामच्या वेळी थांबायला हवं होतं. पण वाटलं काहीतरी सुधारणा होईल,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, त्यांना कधीच पद किंवा निवडणुकीचं तिकीट हवं नव्हतं, परंतु हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे जावा, हीच अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा ठेवूनही त्यांना पक्षात उपेक्षेचा सामना करावा लागला, ही खंत त्यांनी मोकळेपणाने मांडली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, यामुळे त्यांच्या नाराजीला अधिक बळ मिळालं. विशेषतः त्यांनी अमित ठाकरे यांच्याबाबत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अमितजींना शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत काम करेन. पण दुर्दैवाने दिलेला शब्द पाळता आला नाही,” असं म्हणत त्यांनी अमित ठाकरे यांची क्षमा मागितली.
Rain Update | राज्यात पावसाचा पुन्हा कहर! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
प्रकाश महाजन यांचा राजीनामा ही मनसेसाठी केवळ राजकीय नाही तर भावनिकदृष्ट्याही मोठी घसरण मानली जात आहे. सध्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, पक्षाच्या प्रवक्त्याचा असा एक्झिट राज ठाकरेंच्या नेतृत्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. आता पक्ष त्यांना परत आणतो का, की महाजन स्वतःचं नवं राजकीय पाऊल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.