
मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. यावेळी शिवेसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी बोलताना ते म्हणालेले आहेत की, जे गद्दारांसोबत गेले आहेत त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे.
याचसोबत मंत्रीमंडळ विस्तारात खऱा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना कोणतेच स्थान दिलेले नाही. मुंबईकरांनाही देखील स्थान दिलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलं नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असे ते म्हणाले आहेत.
जे नितीश कुमार (Nitish Kumar) यांना जमल ते उद्धव ठाकरेंना का जमल नाही असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला होता यावर ते म्हणालेले आहेत की,“२०१९ मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले, ज्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत”.
याचसोबत पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत की,“ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. तिथे जाऊन ते अडकले आहेत, नजरकैदेत आहेत. आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का असं त्यांना वाटत असेल. त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं.”