
Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आणि आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलन हटवण्यासाठी कारवाईला सुरुवात केली असून, सीएसएमटी स्थानकातून आंदोलकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्य सरकारकडून आंदोलन शमवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करण्याबाबत नोटीस दिली होती. ती नोटीस जरांगेंपर्यंत पोहोचली नसल्याने आज पोलीस अधिकारी थेट मैदानात गेले आणि ती त्यांच्या हातात सुपूर्द केली. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आता पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी करीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी स्थानक परिसरातून बाहेर जाण्याचे निर्देश दिले असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झालं होतं.
दरम्यान, आंदोलकांचा निर्धार मात्र कायम आहे. आंदोलक नेते गंगाधर काळकुटे पाटील यांनी स्पष्ट केलं की, “रस्ते मोकळे केले आहेत, पण आझाद मैदान सोडणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत, आणि आमचे वकील यावर कायदेशीर उत्तर देतील.” त्यांनी सांगितलं की, आंदोलकांनी मैदानात गाड्या हटवल्या असून, उपोषण सुरूच राहील.
आज मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन झाले का, याचा आढावा न्यायालय घेणार आहे. त्यामुळे आंदोलनाच्या भवितव्यावर आजच्या सुनावणीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.