
Maratha Reservation । मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठं आंदोलन छेडलं आहे. सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, राज्य सरकारच्या हालचालींना यामुळे वेग आला आहे.
सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, काही अटींअंती याला एक दिवसाची परवानगी मिळाली आणि नंतर ती मुदत आणखी एक दिवस वाढवण्यात आली. दरम्यान, मराठा समाज आक्रमक भूमिकेत असून, “जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार नाही,” असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अॅक्शन मोडमध्ये जात महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात मुंबईतील रॉयल स्टोन बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य दादा भुसे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे यांच्यासह काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके हे उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर समिती सदस्य आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज्य सरकारवर सध्या मराठा समाजाचा दबाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही बैठक निर्णायक ठरू शकते. आरक्षणाच्या लढ्यात पुढची दिशा काय असेल, याचे संकेत या बैठकीतून मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाज आणि संपूर्ण महाराष्ट्र या घडामोडीकडे आता बारकाईने पाहत आहे.