
Manoj Jarange । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर सकाळीच दाखल झाले. यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी जमलेल्या हजारो आंदोलकांना उद्देशून भाषण केलं. या वेळी त्यांनी सरकारला ठाम शब्दांत इशारा दिला की, “आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मागे हटणार नाही आणि मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या झाडल्या तरीही लढा मागे घेणार नाही.”
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, हे आंदोलन आझाद मैदानावर सुरू झालं आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जरांगेंनी व्यासपीठावरून आंदोलकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट केलं की, “आपण मुंबई जाम करण्याचा निर्णय घेतला होता कारण सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होतं. मात्र आता सरकारने एक दिवस आंदोलनाची परवानगी दिली आहे, याबद्दल त्यांचे आभार. आपण आता मुंबईकरांना, पोलिस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे.”
यावेळी त्यांनी शांततेचं आवाहन करत म्हटलं की, “मुंबईत कोठेही जाळपोळ, दगडफेक करू नका. कुठलाही गोंधळ किंवा अनुशासनभंग झाला, तर आपल्याच आंदोलनाला धक्का बसेल. त्यामुळे संयम ठेवा आणि शांततेत आंदोलन करा.”