Site icon e लोकहित | Marathi News

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारचा धडाकेबाज निर्णय!

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा समाजासाठी आरक्षणाची जोरदार मागणी करत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आगामी मुंबई आंदोलन ऐन तोंडावर असतानाच, महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा उपसमितीचं पुनर्गठन करत नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, परंतु आता त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही उपसमिती मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी कार्यरत राहणार आहे. समितीमध्ये एकूण १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे मंत्र्यांचा समावेश आहे. नवीन समितीमध्ये चंद्रकांत पाटील हे सदस्य म्हणून राहतील. त्यांच्यासोबतच गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील यांचा देखील समावेश आहे.

या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये सरकारची भूमिका बदलतेय की नाही, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन होणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन मागील आंदोलनाच्या तुलनेत पाच पट मोठं असणार आहे.

सरकारकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय निव्वळ राजकीय डॅमेज कंट्रोलसाठी आहे का, की मराठा आरक्षणाच्या दिशेने ठोस पावलं उचलली जात आहेत, याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. सध्या तरी सरकारने उचललेल्या या पावलामुळे घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

Spread the love
Exit mobile version