
Manikrao Kokate । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. विधिमंडळात सुरू असलेल्या प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान त्यांनी ऑनलाईन पत्त्यांचा ‘रमी’ हा गेम खेळल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, त्यांचा राजीनामा मागितला जात आहे.
कोकाटेंनी सुरुवातीला व्हिडीओमधील गेम खेळणं नाकारलं होतं. त्यांनी दावा केला की, मोबाईलमध्ये आलेली जाहिरात स्कीप करत होतो, आणि मी जुगार खेळत नव्हतो. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणखी काही व्हिडीओ समोर आणले असून, कोकाटेंच्या हातात असलेल्या मोबाईलवर जंगली रमी गेम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आव्हाडांनी आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्याकडं पुरावेच पुरावे आहेत. कुठला पत्ता कुठे आणि कसा सरकवला जातोय, हे स्पष्ट दिसतं. हे ऑनलाईन जुगारच आहे.” त्यांनी कोकाटेंवर थेट आरोप करत विचारलं, “आता आणखी किती पुरावे हवेत?”
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, शेतकरी अडचणीत असताना कृषीमंत्री मात्र ऑनलाईन गेममध्ये रमले आहेत, असा संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने होत असून, राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे.