
Malegaon Bomb Blast । 2008 साली महाराष्ट्रातील मालेगावमध्ये घडलेल्या धक्कादायक बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज अखेर निकाल लागला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केलं असून, या निर्णयाने राज्यभर चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.
29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रमजान महिन्याच्या काळात भिक्खू चौकाजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांच्यासह इतर आरोपींवर संशय बळावला होता.
सुरुवातीला महाराष्ट्र ATS कडून तपास करण्यात आला, मात्र नंतर तो राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवण्यात आला. NIA ने या प्रकरणात सात आरोपींविरुद्ध मृत्युदंडाची मागणी केली होती. मात्र 17 वर्षांच्या तपास, साक्षी आणि पुराव्यांच्या परीक्षणानंतर न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी आज सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निकाल दिला.
या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या निकालाचे स्वागत केलं आहे, तर काहींनी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.