
Laxman Hake | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका व्हिडिओमुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हाके यांनी माळी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर माळी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हाके यांच्या विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणताना दिसतात की, “माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ.” या वक्तव्यामुळे माळी समाजातील अनेक लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या विधानामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसल्याची भावना मांडली जात आहे.
मात्र, लक्ष्मण हाके यांनी यावर तात्काळ स्पष्टीकरण देत म्हटले की, “हा व्हिडिओ माझा असला तरी त्यातील आवाज माझा नाही. माळी समाजाविषयी आक्षेपार्ह बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हा व्हिडिओ एडिट करून समाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जरांगे यांच्याविरोधात आंदोलन सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर येतो, यामागे राजकीय कट असू शकतो.”
या घटनेवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “माळी समाजाने अलीकडेच हाके यांचा सत्कार केला होता. त्यानंतर असं वक्तव्य समोर येणं दुर्दैवी आहे. व्हिडिओ खरा की खोटा, हे महत्त्वाचं नाही. पण त्यात ते बोलताना दिसत आहेत, यामुळे त्यांनीच स्पष्ट भूमिका घ्यावी.”