
मुंबई : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असे म्हटले जाते. भारतात जरी औद्योगिक क्षेत्रात प्रगती झाली असेल तरीही शेती हाच भारताचा मुख्य व्यवसाय आहे. ‘ जगाचा पोशिंदा ‘ म्हणणाऱ्या शेतकऱ्याला खुप काबाडकष्ट करून शेती पिकवावी लागते. वाढती महागाई लक्षात घेतली तर रासायनिक खतांच्या व औषधांच्या वाढलेल्या किंमती तसेच पिकास योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्याला शेती करणे परवड नाही. त्यामुळे जास्त खर्च न करता आपण घरगुती पद्धतीने कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार केला पाहिजे. शेतीस पूरक व्यवसाय म्हणजे ‘ पशुपालन’.गाईच्या शेणाचा शेतकरी शेतीस खत म्हणून वापर करता येतो तसेच गोमुत्र सुद्धा शेतीस फायदेशीर आहे. ते कसे?आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शक्यतो आता रासायनिक खत आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसुन येतोय, त्यामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपल्याला जर आपले आरोग्य सुदृढ आणि उत्तम ठेवायचे असेल तर आपण शेती करताना सेंद्रीय पद्धतीनेच केली पाहीजे म्हणजेच शेण खताचा आपण वापर करतोच परंतु गाईच्या गोमुत्राचा सुद्धा शेतीवर औषध फवारणी म्हणून उपयोग केला पाहीजे कारण पीकाच्या वाढीसाठी पुरक असे घटक गोमुत्रात असतात.
गोमुत्रात घटक कोणकोणते असतात?
गोमूत्रात ७०-८० टक्केपाणी असले तरी फॉस्फेट ,युरिया, पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, कार्बलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोज ई.महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
औषध फवारणी म्हणून वापर कसा करायचा?
पीक जोमदार वाढीसाठी पिकावरील रोग नियंत्रण आणणे गरजेचे आहे. पिकावर जर मावा, तुडतुडे, फुलकिडे, भुरी, अळी ई. असेल तर पिकांची होणारी वाढ खुंटते. परिणामी उत्पन्नात घट येते. औषध फवारणी म्हणून गोमुत्राचा वापर करताना एक लिटर पाण्यात 100मिली गोमुत्र मिसळून त्याचे द्रावण तयार करून द्यावे. गोमुत्र मिसळलेले द्रावणाची आठवड्यातून एकदा पिकावर फवारणी करावी यामुळे पिकावरील कीड व भुरी नियंत्रणात येते. तसेच पीक वाढीसाठी आवश्यक असणारे संप्रेरकेही यातून मिळतात. फवारणीमुळे पीक तजेलदार व हिरवेगार दिसु लागते.याचप्रमाणे आपण कांदा लसूणपाकळ्या, तंबाखू, गुळ पाण्यात भिजत ठेवून त्यापासून तयार केलेला अर्क गोमुत्रात मिसळून फवारणी करू शकतो. तसेच हिंगाचाही आपण वापर करू शकतो त्यामुळे पिकावरील किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन किडीची वाढ खुंटते, प्रजनन क्षमता कमी होते.गोमुत्रात नायट्रोजन आणि नत्राचे प्रमाण अधिक असल्याने पिकावर फवारणी करताना योग्य प्रमाणाचा वापर करावा. शक्यतो उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याने पिकावर गोमुत्रची फवारणी करणे टाळावे.