
Havaman Andaj । महाराष्ट्रात सध्या नवरात्रीच्या उत्सवात पावसाने खंड पडू दिलेला नाही. राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने यामुळे पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरवले असून राज्यातील ३६ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
आज, २३ सप्टेंबर रोजी, हवामान विभागाने बीड, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ५ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील उर्वरित ३१ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नंदुरबार, धुळे, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा यांचा समावेश आहे.
मुंबई आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये विजांसह पावसाच्या जोरदार सरींची शक्यता आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण असून दिवसभर अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उभ्या पिकांचेही नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारने संबंधित यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.