
Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवलं आहे. राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई व उपनगरांत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल ७ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, केळी, कापूस, मका व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या तालुक्यातील ३५ गावांमधील शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न पाण्यात वाहून गेले आहे.
मराठवाड्यातील जालना, नांदेड आणि उमरगा तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, जालना शहरात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या १ लाख ६२ हजार क्युसेक वेगाने नदीतून विसर्ग सुरू आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.