
Farmer News । राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. मराठवाडा, सांगली, सातारा अशा जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय निर्णयानुसार (जीआर) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८५०० रुपयांहून अधिक आर्थिक मदत दिली जाणार आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकतीच परभणी जिल्ह्यात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकली. मंत्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शासन सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देऊन मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही शेतकऱ्याला एकटं पडू देणार नाही.”
शेतकऱ्यांकडून हेक्टरी मदतीत वाढ करण्याची मागणी जोर धरत असून, सध्या मंजूर झालेली रक्कम परिस्थितीच्या तुलनेत अपुरी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. गरज भासल्यास अधिक मदतीचा विचार केला जाईल,” असं आश्वासन दिलं.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. “शेतकऱ्यांनी खचू नये, कोणीही टोकाचे निर्णय घेऊ नये,” असा भावनिक सल्ला त्यांनी दिला.