
Devendr Fadanvis । महाराष्ट्रात फडणवीस सरकारने घेतलेल्या एका अचानक निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांची तडकाफडकी बदली करून पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भोयर हे सध्या वर्ध्याचे पालकमंत्री असून आता त्यांच्याकडे भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे.
हा निर्णय का घेण्यात आला, यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. सूत्रांनुसार, संजय सावकारे यांच्यासाठी भंडाऱ्यापर्यंतचा प्रवास लांबचा व अवघड ठरत होता. त्याशिवाय काही स्थानिक भाजप नेत्यांत नाराजीचे सूरही दिसून येत होते. सावकारे केवळ औपचारिक प्रसंगांसाठी उपस्थित राहत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. त्यामुळे प्रशासनावर अधिक प्रभावी पकड असणारा मंत्री नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंकज भोयर यांचा प्रशासनावर उत्तम नियंत्रण आणि कार्यक्षमतेचा अनुभव लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची निवड केली आहे. वर्ध्यात त्यांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून त्याचे कौतुक खुद्द फडणवीसांनी केले होते.
पंकज भोयर यांनी या नवीन जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. वर्ध्यात जसे काम केलं तसं भंडाऱ्यातही शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करेन.” तसेच, “माझ्या स्थानापासून वर्धा आणि भंडारा दोन्ही जवळ आहेत, त्यामुळे कामांना गती येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.