
Crime News | जळगाव शहरालगत ममुराबाद रोडवरील एका फॉर्महाऊसवर बनावट कॉल सेंटर चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे फॉर्महाऊस माजी महापौर आणि सध्या शिवसेना (शिंदे गट) नेते असलेल्या ललित कोल्हे यांच्याच मालकीचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून, परदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या कॉल सेंटरमधून विविध देशांतील नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळण्याचं काम केलं जात होतं. हे कॉल सेंटर परदेशी ग्राहकांना भासवायचं की ते एका मोठ्या नामांकित ऑनलाइन कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती गोळा करून, वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी आर्थिक फसवणूक केली जात होती.
पोलिसांनी एल. के. नावाच्या फॉर्महाऊसवर छापा टाकून ३१ लॅपटॉप्स आणि दोन चालू संगणक जप्त केले. विशेष म्हणजे हे कॉल्स मुख्यतः रात्रीच्या वेळी केले जात होते, जेणेकरून परदेशी वेळेनुसार त्यांचा फसवणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काम करणारे तरुण कोलकाता आणि इतर परराज्यातील आहेत. कारवाईवेळी चार तरुण घटनास्थळी आढळून आले, जे कोलकात्याचे असल्याचं स्पष्ट झालं. चौकशीत त्यांनी सांगितलं की, इथे सुमारे २० ते २५ तरुण काम करत होते. हे बनावट कॉल सेंटर सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी सुरू झालं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार मुंबईतून सर्व हालचाली नियंत्रित करत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सध्या पोलिसांनी सर्व उपकरणं ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास अधिक खोलात सुरू आहे.