
Chhagan Bhujbal On Manoj Jarange । आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांवर टीका करत ठामपणे सांगितले, “मराठा आणि कुणबी एक आहेत, हे म्हणणं हा मूर्खपणा आहे.”
भुजबळ म्हणाले की, “उच्च न्यायालयानेही स्पष्ट केलं आहे की मराठा समाज मागास नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसीतील आरक्षण देता येणार नाही. जरांगे पाटील यांची मागणी घटनाबाह्य असून, ती समाजात संभ्रम निर्माण करणारी आहे.” त्यांनी यावेळी न्यायालयाचा दाखला देत म्हटलं की, “मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करणं कायद्याच्या चौकटीबाहेरचं आहे.”
या बैठकीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, “सर्व ओबीसी नेत्यांनी एकमताने ठरवलं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणं मान्य होणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर परदेशात असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. काही नेते उपोषणस्थळी असल्यामुळे आले नाहीत, पण उपस्थित नेत्यांचं एकमत आहे.”
याचवेळी भुजबळांनी EWS (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. “मराठा समाजाला आधीच EWS अंतर्गत आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मिळतो आहे. १० टक्के EWS आरक्षणात ८ टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत,” असं ते म्हणाले.