Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar Dead । बारामतीचा ढाण्या वाघ शांत: विमान अपघातात अजित पवारांचे दुःखद निधन!

Ajit Pawar

Ajit Pawar Dead । महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या तडफदार कार्यशैलीने आणि स्पष्टवक्तेपणाने ओळखले जाणारे ‘दादा’ अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या अन्य ५ जणांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून बारामतीसह संपूर्ण राज्य पोरकं झालं आहे.

नेमकं काय घडलं?
अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीमधील काही जाहीर सभांसाठी निघाले होते. त्यांचे खाजगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लँडिंगला अवघे काही सेकंद उरले असताना विमानाने अचानक नियंत्रण गमावले. वैमानिकाने विमान सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा भीषण स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण विमानाला वेढले.

विमान कोसळल्याचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विमानातील इंधनामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की कोणालाही जवळ जाता आले नाही. काही वेळातच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन तिथे दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत विमानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातून कोणालाही जिवंत बाहेर काढणे शक्य झाले नाही.

बारामतीवर दु:खाचा डोंगर

ज्या बारामतीसाठी अजित पवारांनी आपलं आयुष्य वेचलं, त्याच मातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दिवसभरात त्यांच्या अनेक सभांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी ऐकण्याची दुर्दैवी वेळ आली. बारामतीमधील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार तात्काळ बंद करण्यात आले असून, शहरात सध्या भयाण शांतता आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.

एक पर्वाचा अंत

अजित पवार म्हणजे प्रशासनावर पकड असलेला आणि शब्दाला जागणारा नेता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Spread the love
Exit mobile version