
Ajit Pawar | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत असून एनडीए एकतर्फी आघाडी घेताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख अजित पवार यांच्यासाठी मात्र हा निकाल धक्कादायक ठरला आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच स्वबळावर लढवलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही, उलट अनेक ठिकाणी त्यांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागत आहे.
राष्ट्रवादीने बिहारमध्ये 15 जागांवर उमेदवार उतरवले होते. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी मतसंख्या 500 च्या आसपास असून, सुमारे 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता बोलली जात आहे. निवडणूक नियमांनुसार, एखाद्या उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या किमान 1/6 मतं मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त होते. राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांची स्थिती याच पातळीवर दिसत आहे.
अजित पवारांनी महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी बिहारची निवड केली होती. विशेषतः राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात होता. पण निकालाने हा प्लान पूर्णपणे फसला आहे. पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीची इतर राज्यांमधील ताकद कमी झाली होती. त्यामुळे बिहार हा नवा प्रयत्न यशस्वी ठरणे गरजेचे होते, पण ते जमले नाही.
एनडीएला 200 हून जास्त जागांवर स्पष्ट आघाडी मिळत असताना, राष्ट्रवादीचा शून्य आकडा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. बिहारमधील अपयशामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रयत्नांना मोठा ब्रेक लागला असून, महाराष्ट्रातही विरोधकांकडून आता नव्या टीकेची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.
बिहारमधील पराभवाने राष्ट्रवादीचे मनोबल खच्ची झाले असून, पुढील रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.