
गुजरात : गुजरात (Gujrat) येथील मोरबी जिल्ह्यामधील एका प्राथमिक शाळेत दलितांनी शिजवलेले अन्न खाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नकार दिला असा आरोप कंत्राटदार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र विद्यालयातील प्रशासनाने या बाबत संपूर्ण माहिती दिलेली असून याचा खुलासा करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर विद्यार्थांच्या पालकांची आणि शिक्षकांची शिक्षण आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.
कंत्राटदारांनी असा आरोप केला आहे की, विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी 100 विद्यार्थ्यांचे जेवण बनवायला सांगितले होते पण केवळ 7 विद्यार्थीच जेवण करण्यासाठी आले. याआधी जेवण बनवणारे कॉन्ट्रैक्टर ओबीसी समाजातील होते पण त्यांच्यावेळी असा प्रकार कधीच घडला नाही. आता हे अन्न दलित समूदायातील लोकांकडून शिजवले जाते त्यामुळे हे अन्न खाण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला आहे.
यावर विद्यालयातील प्रशासनाने आपले मत मांडून या आरोपाचे खंडन केलेले आहे. शाळेत एकुण १५३ विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी जेवणाचा डबा घरूनच आणतात. घरून आणलेला जेवणाचा डबा शाळेत मिळणाऱ्या जेवणाऐवजी त्यांना खायला जास्त आवडतो असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे.
दरम्यान, शाळेत शिजवलेले अन्न मुलांना आवडले तर ते खातीलच पण ते अन्न खाण्यासाठी आपण त्यांना जबरदस्ती करु शकत नाही असे गावचे सरपंच म्हणालेले आहेत.