Farmer News । बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींचं दिलासादायक पॅकेज जाहीर

Cabinet metting

Farmer News । राज्यात मागील काही आठवड्यांतील अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पीकपाणी, जनावरे, घरे, रस्ते आणि सिंचन व्यवस्था यावर याचा मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹३१,६२८ कोटींचं विशेष मदत पॅकेज जाहीर केलं आहे.

या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या पॅकेजअंतर्गत पूरग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.

कशा पद्धतीने होणार वाटप?

राज्यातील २९ जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार असून, जिल्हा आणि तालुका पातळीवर पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल. ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत खात्री करून शेतकऱ्यांची बँक माहिती अद्ययावत केली जाईल आणि त्यानंतर DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

कोणती मदत मिळणार?

डोंगराळ भागात कोसळलेल्या घरांसाठी ₹१०,००० पर्यंत तातडीची मदत
दुधाळ जनावरे मृत झाल्यास ₹३७,००० पर्यंत नुकसान भरपाई
पावसामुळे खरडून गेलेल्या शेतीसाठी ₹४२,००० प्रति हेक्टरी आर्थिक सहाय्य
विहीर दुरुस्ती/बांधणीसाठी ₹३०,०००
बाधित रस्ते, पूल आणि वीजपुरवठा दुरुस्तीसाठी ₹१,५०० कोटींचा स्वतंत्र निधी

पुढील हंगामासाठीही मदतीचा हात

रब्बी हंगामासाठी बियाण्यांचे विशेष अनुदान दिलं जाणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ₹३५,००० तर बागायतीसाठी ₹५०,००० पर्यंत मदतीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, पीक विमा घेतलेल्या सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येतो आहे.

Spread the love