
Zilla Parishad elections 2025 । महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट संकेत समोर आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या निवडणुकांबाबत आता पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपरिषद निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान, होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात, १५ ते २० तारखांच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकाही घेण्यात येऊ शकतात. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातही राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
यात सगळ्यात जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे ती महानगरपालिका निवडणुकांबाबत. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा प्रमुख शहरांतील महापालिकांमध्ये निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी १५ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी घेण्याची शक्यता आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील. मात्र, युतीतीलच काही नेते वेगळं मत मांडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतीच प्रतिक्रिया देताना, “स्वबळाची भाषा अजूनही सुरू आहे” असं सांगितलं. तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट युती करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.