
Kunbi Certificate | मराठा आरक्षणासाठी गेले अनेक महिने चाललेल्या संघर्षाला अखेर दिलासा मिळाला असून, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. हे प्रमाणपत्र वाटप मराठा समाजासाठी एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण दिले, उपोषणं केली, रस्त्यावर उतरले आणि अखेर या लढ्याला पहिलं यश मिळालं आहे.
बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिल्यांदाच पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने काढलेल्या जीआरनंतर ही अंमलबजावणी झाली आहे. हैदराबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींवर आधारित या प्रमाणपत्रांमध्ये ‘कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
धाराशिव येथेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अभिषेक, प्रगती, पूजा आणि गणेश व्यंकटेश मुंडे या चौघांना प्रमाणपत्रे देण्यात आली. हिंगोलीत पालकमंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते तब्बल ५० जणांना प्रमाणपत्रे मिळाली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या पावलाचं स्वागत केलं असलं तरी काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “८४ च्या जीआरचा आधार नेमका कसा घेतला गेला हे स्पष्ट व्हायला हवं,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, जर आरक्षणाबाबत काही गोंधळ झाला, तर दसऱ्यानंतर आंदोलन वेगळ्या पद्धतीने उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.