
Havaman Andaj । राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुंबई, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काल मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी त्य intensity मध्ये मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ तास अत्यंत धोकादायक असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि परिसराला बसलेला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल्स १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत, तर वेस्टर्न रेल्वेवरील विरार-चर्चगेट लोकल ५ ते ७ मिनिटांनी उशिरात आहेत. हार्बर लाईनवरही सेवेला विलंब होत असून नेरूळ-CSMT लोकल ६ ते ७ मिनिटं उशिराने चालत आहे.
मुंबईतील किंग सर्कल, गोरेगाव, सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची प्रचंड गर्दी असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
बार्शी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदणी नदी परिसरात पुराचे पाणी शिरल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासात वाऱ्याचा वेग ३०-४० किमी/तास राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पावसाची दहशत सुरू असून प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा इशारा देण्यात आला आहे.